वैशिष्ट्यीकृत

सर्वांना हवेहवेसे वाटणारे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे सेवानिवृत्त

 


                      (विशाल पुरंदरे)

प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे यांनी आपल्या अनोख्या कार्यशैलीने शिवाजी महाविद्यालयाला नवीन ओळख मिळवून दिली. विद्यार्थी -शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हवेहवेसे वाटणारे भिसे सर उद्यापासून महाविद्यालयात येणार नाहीत, हे लक्षात येताच अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत.


   30 जूनला दुपारी अकोला येथील शिवाजी महाविद्यालयात मान्यवरांचे आगमन सुरू झाले. औचित्य होते प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभाचे. भिसे सर म्हणजे केवळ केबिनमध्ये बसून राहणारे प्राचार्य नव्हते. सतत महाविद्यालयाच्या आवारात त्यांच्या फेऱ्या सुरू राहत. विद्यार्थी विनाकारण फिरताना दिसले की गळ्यात आय कार्ड का नाही? चला वर्गात बसा, असे ते म्हणत. विद्यार्थ्यांना त्यांची आदरयुक्त भीती होती. कॅन्टीन मध्ये विद्यार्थ्यांसोबत हितगुज करीत असताना ते विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेत. विद्यार्थी मोकळेपणाने त्यांच्याजवळ आपल्या भावना व्यक्त करीत. विद्यार्थ्यांना भिसे सर आपल्या जवळचे मित्र वाटू लागले होते.


दहावी उत्तीर्ण होऊन अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनमौजी जीवन असते. मात्र हाच जीवनातील महत्त्वाचा टप्पा आहे, त्यामुळे नियमित कॉलेज अटेंड करा, हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यांनी समजावून सांगितलेल्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनावर खोलवर रुजत.


एखाद्या कर्मचाऱ्याची काही चूक झाली तरी केबिनमध्ये बोलावून त्याला समजावून सांगत. शिक्षा, कारवाई करण्यापेक्षा कोणताही प्रसंग ते समजूतदारपणाने तडीस नेत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचावला. विद्यार्थी घडवण्यावर त्यांचा भर होता, म्हणूनच त्यांनी व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांवर जोर दिला. त्यांच्या मार्गदर्शनात अनेक विद्यार्थ्यांनी मोठमोठ्या पदांवर मजल मारली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमात स्वच्छता करण्यासाठी ते स्वतः पुढे होत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढत होता. 


आज शिवाजी महाविद्यालयाचा परिसर हिरवा गार झाला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भाषण देण्यापेक्षा त्यांनी कार्य करून दाखविले आहे. अशा दिलखुलास, हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला अकोला महानगरपालिकेने स्वच्छता दूत उपाधी देऊन गौरव केला आहे. अजात शत्रू म्हणून त्यांची ओळख आहे. सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास असल्याने हजारो विद्यार्थ्यांसाठी ते आदर्श बनले होते. 



प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे तसेच वाणिज्य शाखाप्रमुख डॉक्टर संजय तिडके यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभाला प्राध्यापक वृंदासह संस्थेचे पदाधिकारी, आजीवन सदस्य आवर्जून उपस्थित होते.

शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, शिक्षण तज्ञ गजानन नारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले, उपाध्यक्ष गजाननराव पुंडकर, उपाध्यक्ष केशवराव मेतकर, उपाध्यक्ष जयंतराव पाटील पुसदेकर, मा. प्राचार्य केशवराव गावंडे, सुरेशराव खोटरे, विजय ठोकळ, प्राध्यापक सुरेश राऊत, प्रशांत देशमुख, अशोकराव देशमुख, शेषराव काळे यांच्यासह प्राध्यापकांनी डॉक्टर भिसे यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


अध्यक्षांच्या हस्ते सत्कार


समारंभात शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते डॉक्टर रामेश्वर भिसे यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला भिसे सरांचे आई वडील सुद्धा उपस्थित असल्याने दुग्ध शर्करा योग जुळून आला. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्थेत आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. आई वडिलांच्या आशीर्वादामुळेच प्रगती करणे शक्य झाले अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

टिप्पण्या