बावनकुळे मंत्री नाही तो ठेकेदार आहे
आमदार नितीन देशमुख यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक
अकोला, दि. 8 ऑक्टोबर 2026 : बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख (उबाठा गट) यांनी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बेताल व बदनामीकारक वक्तव्य केल्याचा भाजपचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हे निवेदन जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक, सिव्हील लाईन पोलीस ठाणे, अकोला यांना देण्यात आले आहे.
याप्रसंगी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वात रमण जैन, किशोर कुचके, नितीन लांडे, गणेश गाडगे, नरेश फुरंगे, चंद्रकांत अंधारे, कपिल खरप, विजय फुकट, अजिंक्य राऊत, राजूभाऊ उगले, अजय ढोणे, मंगेश भरणे, योगेश पटोकार, माधव म्हैसने, विक्की वडतकार, अक्षय भाकरे, कैलास इंगळे उपस्थित होते.
प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार 07 ऑक्टोबर 2026 रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आमदार नितीन देशमुख यांनी शासकीय कार्यालयात घुसून शासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी करत, 'बावनकुळे मंत्री नाही, तो ठेकेदार आहे' असे अत्यंत अवमानकारक वक्तव्य केले आहे. हा पदाचा गैरवापर असून शासकीय कामात अडथळा आहे. बावनकुळे हे ओबीसी समाजाचे मोठे नेते असून त्यांच्याबद्दल असे द्वेषपूर्ण बोलणे हे अकोला जिल्ह्याची शांतता बिघडवणारे वक्तव्य आहे, असा आरोप निवेदनात केला आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या मागण्या
1) आमदार नितीन देशमुख यांच्यावर शासकीय कामात अडथळा व बदनामीबद्दल तात्काळ FIR दाखल करावा.
2) सदर व्हिडिओची चौकशी करून व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करावी.
कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार बळीराम भगवान सिरस्कार यांनी दिला आहे.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा