पावसासाठी अमरनाथ यात्रेकरूंचा पंचकुंडीय महायज्ञ
अकोला : अकोला जिल्ह्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने खरीप पिके संकटात आली असून, धरणे व जलसाठेही अपेक्षेप्रमाणे भरलेले नाहीत. पऱ्हाटी, सोयाबीनसह विविध पिकांना पावसाची नितांत गरज असताना बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी बाबा अमरनाथ यात्रेकरूंनीच थेट वरुणराजाला साकडे घातले. गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सृजन लॉन्स येथे पंचकुंडीय पूर्णाहुती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले.
गुड मॉर्निंग ग्रुपच्या १८ सदस्यांनी यावर्षी बाबा अमरनाथ यात्रेचे आयोजन केले होते. पहलगाम मार्गे दि. ८ जुलै रोजी बाबा अमरनाथांचे दर्शन घेण्यात आले. जम्मूतील कडक उन्हापासून सुरू झालेला हा प्रवास चंदनवाडी, शेषनाग आणि पंचतरणीचा खडतर मार्ग पार करीत पवित्र अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचला. प्रतिकूल परिस्थिती, डोंगरदऱ्यांचा कठीण प्रवास आणि बदलते हवामान यावर मात करीत सर्व यात्रेकरूंना बाबा बर्फानींचे दर्शन झाले.
विशेष म्हणजे, यात्रेनंतर काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे यात्रा बंद करण्याची वेळ आली. मात्र त्यापूर्वीच गुड मॉर्निंग ग्रुपच्या यात्रेकरूंना कोणताही मोठा अडथळा न येता दर्शनाचा लाभ मिळाला. दि. १५ जुलै रोजी सर्व यात्रेकरू अकोल्यात परतले.
अमरनाथ यात्रेतील पावसाचा अनुभव आणि अकोल्यातील पावसाची प्रतीक्षा, या पार्श्वभूमीवर ग्रुपच्या सदस्यांनी बळीराजासाठी सामूहिक प्रार्थनेचा संकल्प केला. श्रावणात हजारो शिवभक्तांनी राजराजेश्वराला जलाभिषेक केला असतानाही अकोला जिल्ह्यावर वरुणराजाची अपेक्षित कृपादृष्टी अद्याप झालेली नाही. काही भागांत झालेल्या तुटपुंज्या पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला; मात्र पावसाने पुन्हा विश्रापावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने पिकांची चिंता वाढली आहे.
“शेतकरी सुखी झाला पाहिजे, पिके वाचली पाहिजेत, धरणे भरली पाहिजेत आणि वर्षभर पिण्याच्या पाण्याची चिंता राहू नये,” या भावनेतून पंचकुंडीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. गायत्री परिवाराचे डॉ. उपाध्याय यांच्या सहकार्याने विधिवत यज्ञ व पूर्णाहुती पार पडली.
यज्ञामध्ये डॉ. अशोक ओळंबे, प्रशांत बानोले, दिनकरराव घोडेराव, गजानन घोंगे, राजाभाऊ देशमुख, अरुण मानकर, अॅड. संतोष गोळे, गजानन गोलाईत, शिवहरी वाकोडे, अमोल हिंगणे, गजानन मोरे, चंदू घाटोळे, गजानन टाले, दत्ता भुसारी, गजानन दलाल व संतोष इंगोले यांनी सपत्नीक सहभाग घेतला. डॉ. पौर्णिमा ओळंबे यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमास संतोष काटे, प्रवीण कदम, सुरेंद्र सिरसाट यांच्यासह गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अमरनाथच्या बर्फानी बाबांच्या दर्शनानंतर आता अकोल्यातील बळीराजासाठी वरुणराजाला साकडे—या अनोख्या उपक्रमाची शहरात चर्चा झाली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा