वैशिष्ट्यीकृत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
'तुझा मुलगा मरणार आहे का?' प्रकरणाची दखल; सीएमओची तात्काळ उचलबांगडी, चौकशी समिती गठित
आमदार साजिद पठाण यांच्या हस्तक्षेपानंतर जीएमसी प्रशासनाची धावपळ, डीनकडून कडक इशारा
अकोला : जिल्हा शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) यांनी एका आजारी चिमुकल्याच्या आईशी कथितपणे केलेल्या अमानुष आणि अवमानकारक वक्तव्याची बातम्या बुधवारी प्रसिद्ध होताच अखेर जीएमसी प्रशासनाला कारवाईची चाके फिरवावी लागली. "तुझा मुलगा मरणार आहे का? मला सलाईन लावता येणार नाही... तुला जेथे तक्रार करायची आहे तेथे कर," असे कथित वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप असलेल्या डॉ. पुरुषोत्तम हंबर्डे यांना तात्काळ अपघात कक्षातून हटवून इतरत्र बदली करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीही गठित करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनीही कठोर भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत प्रशासनाने हालचाली सुरू केल्याने या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली आहे.
रुग्णालयात सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या आशा शेख बशीर यांनी आपल्या आजारी मुलाला उपचारासाठी नेल्यानंतर सीएमओंकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा गंभीर आरोप केला होता. उपचाराऐवजी उद्धट भाषा वापरल्याचे त्यांनी लेखी तक्रारीत नमूद केले असून, सात दिवसांत न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशाराही दिला होता. या धक्कादायक तक्रारीने जिल्हाभरात संतापाची लाट उसळली होती.
चौकट :
सीएमओ हटविले; चौकशी समितीची स्थापना
या प्रकरणाची दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांनी डॉ. पुरुषोत्तम हंबर्डे यांना अपघात कक्षातून तात्काळ हटवून इतरत्र बदली करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तक्रारदार महिलेची सविस्तर बाजू ऐकून निष्पक्ष चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रविण सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली असून, सदस्य म्हणून डॉ. अभय बागुल (प्राध्यापक व विभागप्रमुख, बालरोगशास्त्र), डॉ. धोडीबा भिसे (प्राध्यापक व विभागप्रमुख, टीबी व चेस्टरोग विभाग), डॉ. रवी खंडारे (सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्सा विभाग) आणि श्रीमती ग्रेसी अगस्तीन (अधिसेविका) यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
चौकट :
डीनचा सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना कडक इशारा
या घटनेनंतर डीन डॉ. संजय सोनुने यांनी जीएमसीमधील सर्व सीएमओ, डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांशी कोणत्याही परिस्थितीत गैरवर्तन, उद्धट वागणूक किंवा अवमानकारक भाषा वापरली जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. "यापुढे रुग्णांसोबत गैरवर्तन केल्यास कठोर कारवाईसाठी तयार राहावे," असेही त्यांनी बजावले आहे.
चौकट :
आमदार पठाण यांच्या पाठपुराव्याला यश
या प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांनी अधिष्ठात्यांना अधिकृत पत्र पाठवून संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध सखोल चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर लगेचच सीएमओची अपघात कक्षातून बदली आणि चौकशी समितीची घोषणा झाल्याने प्रशासनावर वाढत्या दबावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, केवळ बदलीवर प्रकरण संपणार की दोषी आढळल्यास कठोर शिस्तभंगाची कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट :
बदली हा उपाय की कारवाईची सुरुवात?
रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका आजारी मुलाच्या आईशी गैरवर्तन झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे केवळ अपघात कक्षातून बदली हा अंतिम उपाय ठरणार नाही, तर चौकशी अहवालात आरोप सिद्ध झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाई होते का, यावरच जीएमसी प्रशासनाची विश्वासार्हता अवलंबून राहणार आहे. गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना सन्मानाने उपचार मिळणे हा त्यांचा अधिकार असून, अशा घटनांमुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
श्री शिवाजी महाविद्यालयात गेस्ट लेक्चर संपन्न
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा