मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

आमदार सावरकरांचे निकटवर्तीय संकेत काटे यांनी व्हिएतनाममध्ये रोवला यशाचा झेंडा ! अकोला, दि. 20 ऑगस्ट 2026 : अकोला पूर्व मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर यांचे स्वीय सहाय्यक संतोष काटे यांचे चिरंजीव संकेत काटे यांना व्हिएतनामच्या दा नांग येथे बजाज ग्रुपचे अध्यक्ष शेखर बजाज आणि बजेल प्रोजेक्ट्सचे MD & CEO राजेश गणेश यांच्या हस्ते "बेस्ट परफॉर्मर अवॉर्ड" प्रदान करण्यात आला. संकेतने शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात सातत्याने प्रगती केली आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातून आलेल्या संकेतने वडिलांच्या कष्टातून आणि आई-वडिलांच्या संस्कारांवर आज मुंबई येथे आपल्या कर्तुत्वाने नाव कमावले आहे. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या या कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे नाव मोठे झाले आहे. आमदार सावरकर यांच्या शुभेच्छा ! संकेतने आपल्या कर्तृत्वाने व्हियेतनाम मध्ये प्राप्त केलेल्या पुरस्काराने अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. संकेतला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा! - आमदार रणधीर सावरकर

 प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी
आ. पठाण यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस देणार लढा




अकोला : शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, पूरस्थिती, घनकचरा, प्रदूषण, नागरी नियोजन आणि कथित भ्रष्टाचाराच्या प्रश्नांवर नागरिकांना सहभागी करून घेत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी काँग्रेसने ‘हक्काचं शहर’ अभियानाची सुरुवात केली आहे.

अकोला शहरात आमदार साजिद खान पठाण यांच्या मार्गदर्शनात लढा देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘शहर परिवर्तन गट’अंतर्गत अकोला शहरात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांच्या समस्या केवळ निवेदने आणि आंदोलनांपुरत्या मर्यादित न ठेवता त्यांचा अभ्यास, जनसुनावणी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे.


राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून अभियानाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. अकोला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र गवई यांनी अभियानाची भूमिका स्पष्ट केली. शहरातील विविध नागरी प्रश्नांवर नागरिकांना सोबत घेऊन आंदोलने, मोर्चे आणि निदर्शने उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.


शहरातील नागरिक विविध कर, अधिभार, शुल्क आणि दंडाच्या माध्यमातून शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना महसूल देतात. मात्र, त्याच्या तुलनेत मूलभूत नागरी सुविधा मिळत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. खराब रस्ते, अपुरा पाणीपुरवठा, पावसाळ्यातील पूरस्थिती, घनकचरा व्यवस्थापन, प्रदूषण, घरकुल योजना, नागरी नियोजन यांसह विविध प्रश्न अभियानाच्या माध्यमातून लावून धरण्यात येणार आहेत.


‘हक्काचं शहर’ अभियान केवळ आंदोलनापुरते मर्यादित न ठेवता शहरातील प्रश्नांचा कायदेशीर, तांत्रिक आणि प्रशासकीय पातळीवर अभ्यास केला जाणार आहे. त्यासाठी नगररचनाकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त अधिकारी, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आदींचा समावेश असलेल्या तज्ज्ञ समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. संबंधित प्रश्नांची वस्तुस्थिती समोर आणून प्रशासनाची जबाबदारी निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.


शहरातील प्रत्येक प्रभागात नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. जनसुनावणीच्या माध्यमातून तक्रारी आणि प्रश्न नोंदवून संबंधित विभागांकडे त्यांचा पाठपुरावा केला जाईल. तसेच महापालिकेच्या निर्णयप्रक्रियेवर नागरिकांच्या दृष्टिकोनातून पर्यायी भूमिका मांडण्यासाठी ‘शॅडो जनरल बॉडी’ बैठका घेण्याचेही नियोजन आहे.



नागरी प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यासाठी तरुणांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. यासाठी रील आणि व्हिडिओ स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून, शहरातील समस्या प्रभावीपणे मांडणाऱ्या तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. उत्कृष्ट सादरीकरणांची शहर तसेच राज्यस्तरावर निवड करण्याचे नियोजन असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.


‘शहरी राजकारण बदलूया, हक्काचं शहर घडवूया’ या संकल्पनेतून शहर विकासाच्या निर्णयप्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार आणि नागरिकांचा निर्णयप्रक्रियेत सहभाग याबाबत राजीव गांधी यांच्या विचारांशी अभियानाची सांगड घालण्यात आली आहे. ७४व्या घटनादुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासात नागरिकांची भूमिका अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.



नागरी प्रश्नांवर केवळ चर्चा न करता गरजेनुसार प्रशासनाविरोधात आंदोलने, मोर्चे आणि निदर्शने करण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे. तरुण, कामगार, डॉक्टर, वकील, पत्रकार, लेखक-कलाकार, शिक्षक, आर्किटेक्ट, नगररचनाकार, उद्योजक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह विविध घटकांना अभियानाशी जोडण्याचे नियोजन आहे.


‘हक्काचं शहर’च्या माध्यमातून अकोल्यातील नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवून नागरिकांची लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात या अभियानातून शहरातील नागरी प्रश्नांवर प्रशासनावर किती दबाव निर्माण होतो, याकडे लक्ष लागले आहे.


पत्रकार परिषदेला महेंद्र गवई, प्रकाश तायडे, डॉ. झीशान हुसैन, डॉ. सुधीर ढोणे, अक्षय राऊत, कपिल रावदेव, विजय तिवारी, मनिष मिश्रा, योगेश थोरात, शकील अहमद, श्रीकांत सरोदे, गणेश कळसकर, विनोद नालट, प्रशांत प्रधान, विनोद मराठे, सुनील वानखडे, मंथन शिरसाट, मोहम्मद इरफान, मोईन खान ऊर्फ मोंटू, विनोद अंबुसकर आदी उपस्थित होते.



चौकट : 


नागरिकांच्या हक्कासाठी काँग्रेसचा संघर्ष

अकोला शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, वीज यांसह नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाचा आवाज काँग्रेसच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचविला जाईल. ‘हक्काचं शहर’ अभियानातून प्रत्येक वॉर्डातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत. केवळ समस्या ऐकून न घेता त्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल. जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस ठामपणे संघर्ष करेल. 


महेंद्र गवई, अध्यक्ष, अकोला शहर काँग्रेस कमिटी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट