सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरू आहे. घरोघरी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. महालक्ष्मी पूजनाची सुद्धा लगबग सुरू होती. अशातच अचानक दिनेश सरोदे यांच्या निधनाची वार्ता कानावर आली. दोन मिनिट मन सुन्न झालं.
माझा आणि गणेश, दिनेश आणि योगेश तीनही भावांचा तीस वर्षापासूनचा परिचय. लहानपणापासूनच अत्यंत परिश्रमी. जिद्द व चिकाटीने व्यवसाय करीत उदरनिर्वाह चालविणारे सरोदे कुटुंब. दिनेश म्हणजे सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व. कितीही ताण असला तरी प्रसन्न राहण्याची कला त्याला साधली होती. आपल्या चिंता दुःख बाजूला सारून सदैव दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तो तत्पर असायचा. सतत चेहऱ्यावर स्मितहास्य.
कोणाच्याही अडीअडचणीला धावून जाण्याच्या दिनेशच्या स्वभावामुळे भौरद ग्रामपंचायत सदस्य पदी त्यांची निवड झाली. बालपणापासूनच सामाजिक बांधिलकी जपण्याचे वरदान त्याला लाभले होते. त्यामुळे दिनेश चा मित्रपरिवार वाढतच गेला. लक्ष्मी नगर मध्ये गणेशोत्सव, दुर्गोत्सव, भागवत सप्ताह किंवा इतर कुठलाही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी दिनेश भाऊ नेहमीच पुढाकार घेत.
गेल्या एक दोन वर्षापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे चिंता वाटत होती. परंतु अचानक अशी घटना घडेल, याची अजिबात कल्पना नव्हती. अजूनही दिनेश आपल्या मधून गेला हे खरे वाटत नाही. दिनेशच्या अचानक जाण्याने जुन्या शहरात, आमच्या लक्ष्मीनगर मध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. यापुढे दिनेश भाऊ नसले तरी त्यांच्या आठवणी सतत चांगल्या कार्यासाठी प्रेरणा देत राहतील.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या