वैशिष्ट्यीकृत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
माझा जर खून झाला, तर मृत्यूनंतर मंदिराचे बांधकाम पूर्ण करा
बिश्नोई गँग च्या धमकीनंतर आमदार साजिद खान पठाण यांची प्रतिक्रिया
अकोला : धमक्यांना मी घाबरत नाही. मात्र उद्या बाबा सिद्दीकी यांच्याप्रमाणे माझाही खून झाला, तर मी मंदिरासाठी मागितलेला निधी मंजूर करून त्या मंदिराचे बांधकाम विधानसभा अध्यक्षांनी पूर्ण करावे. बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्यानंतर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अकोल्याचे काँग्रेस आमदार
साजिद खान पठाण यांना पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आलेल्या धमकीच्या फोनमध्ये खंडणीची मागणी करण्यात आली असून, पैसे न दिल्यास हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या धमकीचे पडसाद विधीमंडळात उमटले
मिळालेल्या माहितीनुसार, धमकीचा फोन थेट काँग्रेसचे नगरसेवक आकाश कावडे यांना करण्यात आला. फोनवरील व्यक्तीने स्वतःला बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे सांगत, साजिद पठाण यांनी आमचे ऐकले नाही, तर २ जुलै रोजी दुपारी २ वाजता काय होते ते दाखवून देतो, अशी धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. या संभाषणाचे कथित ऑडिओ रेकॉर्डिंगही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्याची सत्यता तपासण्याचे काम पोलिस यंत्रणा करत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील कथित धमकीच्या फोनचे ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यातील संभाषण अत्यंत धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. ऑडिओमध्ये धमकी देणारा व्यक्ती म्हणतो, साजिद खान यांना ही लास्ट वॉर्निंग आहे. त्यांना सांग, शुभमचा कॉल आला होता. सेटलमेंटसाठी अजूनही तुझ्याकडे वेळ आहे. लाईनवर ये, नाहीतर मारून टाकेन. पैशांची व्यवस्था कर, नाहीतर मौत के लिए तयार हो जा. माझ्याबद्दल त्याला माहिती आहे. मी आधीही त्याला फोन केला आहे. आता फोन नाही येणार, आता डायरेक्ट गोळी येईल. विशेष म्हणजे, साजिद पठाण यांना बिश्नोई
गँगकडून धमकी येण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वीही त्यांना अशाच प्रकारची धमकी मिळाली होती
दोन दिवसांपूर्वी विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीद्वारे हा गंभीर मुद्दा उपस्थित करत, आमदारांना गुन्हेगारी टोळ्यांकडून धमक्या मिळत असल्याबद्दल सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही सभागृहात बिश्नोई गँग फोन करून आमदारांना धमक्या देत आहे, असा गंभीर दावा केला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करेल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते.
दरम्यान, धमकीचा कथित ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असताना लोकप्रतिनिधींनाच अशा प्रकारच्या धमक्या मिळत असल्याने सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बिश्नोई गँगच्या धमकीवरून वडेट्टीवार विधानसभेत झाले आक्रमक
काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून सलग दुसऱ्यांदा धमकीचा फोन आल्याने सभागृहात खळबळ उडाली. विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत विचारले, जर चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना २५ सुरक्षारक्षक दिले जाऊ शकतात, तर जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांना तशीच सुरक्षा का दिली जात नाही? या प्रकरणाची सखोल चौकशी करून पठाण यांना तत्काळ अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. यावर विधानसभा अध्यक्षांनी, लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची असून धोका लक्षात घेऊन आवश्यक ते संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
शिवाजी महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे थाटात स्वागत !
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा