वैशिष्ट्यीकृत
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
‘मटका किंग’- "मनाचा मटका बनवणारी वेबसिरीज”
‘मटका किंग’ या वेबसिरीज बद्दल बोलायचं ते यासाठी की, या वेबसिरीज मध्ये आपल्या अकोल्याचा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य कुटुंबातील मुलगा जो संघर्ष करीत या मायानगरीत आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. ते ही कोणतीही सिनेमाची पार्श्वभूमी नसताना केवळ अभिनय, सातत्य आणी संघर्षाच्या भरवशावर त्या अभिनेत्याचे नाव आहे विक्की मोटे कलागुणांची खाण असलेल्या श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला चा हा विद्यार्थी महाविद्यालयातुन नाटक, एकांकिका तसेचं विद्यापीठ युवा महोत्सवात भाग घेऊन सिनेसृष्टी कडे वळला आणि आज तो या वेबसिरीज मध्ये अभिनेता सिध्दार्थ जाधव सोबत प्रत्येक भागात दिसून आला. याचा अकोलेकर म्हणून आम्हाला जास्त अभिमान आहे. या आधी त्याने सैफ अली खान सोबत ‘सॅक्रेट गेम्स-२’ या वेबसिरीज मध्ये काम केले आहे. त्याचप्रमाणे नुकताचं त्याचा ‘सालबर्डी’ नावाचा मराठी चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. मराठी वेबसिरीज समांतर-२, अवनी, कोण प्रविण तांबे? यामध्ये आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आहे. तसेचं मेरे साई, देवा शपत, प्रेमा तुझा रंग कसा, छत्रिवाली, घाडगे अन सुन,छोटी मालकिन , बाळु मामाच्या नावान चांगभलं, अजब सास की गजब बहू, तुझ्या इश्काचा नादखुळा अशा अनेक मराठी व हिंदी मालिकेत अभिनय केला आहे.कान्स फिल्म फेस्टीव्हल मध्ये गौरविण्यात आलेल्या “भारत माझा देश आहे”या सिनेमासाठी त्याने सहाय्यक कला दिग्दर्शक म्हनुन देखील काम केले आहे.
‘मटका किंग’ ही वेबसिरीज १७ एप्रिल २०२६ रोजी भारतासह जगभरातील २४० देश आणि प्रदेशांमध्ये ‘प्राइम व्हिडिओवर’ प्रदर्शित झाली आहे. सिद्धार्थ रॉय कपूर फिल्म्स, आटपाट आणि एसएमआर एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली अभय कोरणे यांनी या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील अभ्यासू दिग्दर्शक, मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट घेऊन येणारे, राष्ट्रीय पुरस्कार विजेते, सैराट, फॅन्ड्री, नाळ यांसारख्या दर्जेदार प्रोजेक्ट्समधून मातीतल्या वास्तववादी कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारे दिग्दर्शक-निर्माते नागराज पोपटराव मंजुळे यांनी ही वेबसिरीज लिहिलेली व दिग्दर्शित केली आहे. या वेबसिरीज मध्ये मराठी कलाकारांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली हे विशेष कलाकार म्हणून रतन खत्री च्या भूमिकेत विजय वर्मा आहेत सोबत मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर , सिद्धार्थ जाधव, क्रितिका कामरा, गुलशन ग्रोव्हर, गिरीश कुलकर्णी, भरत जाधव, किशोर कदम, भूपेंद्र जडावत, जॅमी लिव्हर, विनीक कुमार सिंग, संभाजी तांगडे. सायरस साहूकार, अर्पिता सेठिया,इश्तियाक खान, संजीव जोटांगिया सिमरन अश्विनी, आणी आपल्या विदर्भाचा सुपुत्र विक्की मोटे यांचा समावेश आहे.
‘मटका किंग’ही केवळ एक वेबसिरीज नाही.
तर १९६०-७० च्या मुंबईच्या गल्ली-गल्लीतुन उभ्या राहिलेल्या जुगाराच्या त्या साम्राज्याची कहाणी आहे ज्याने गरीब-श्रीमंत हा भेद नष्ट करत ‘गरीब-श्रीमंताची’ बेटे निर्माण केली.
पण या कथेचा अंत जेव्हा ‘हरवलेली’ माणसं दाखवतो तेव्हा डोळ्यांसमोर फक्त धूर उरतो.
गरीब आणी श्रीमंत यांचे पेट्रोल एकचं ते म्हणजे ‘आशा’ म्हणजेचं ‘उम्मीद’ या एका टॅगलाईन वर आणी प्रामाणिकपणा व सामान्य जनतेचा विश्वास यावर एका जुगाराचं साम्राज्य उभं राहतं ही ऐतिहासिक गोष्ट आहे. बेईमानी चं काम इमानदारी ने करणे याला म्हणतात. श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाला आयुष्यात एक मोठी झेप घेण्याचा हक्क असावा. यावर नायकाचा विश्वास असतो. नायक आपल्या तत्वांना फार महत्व देतो पण या तत्वांशी तो प्रामाणिक असतांना नात्यांशी मात्र तो बेईमान ठरतो.सर्वात वेदनादायी भाग म्हणजे जिथे नायक ‘संपूर्ण राष्ट्राचे कर्ज फेडू शकतो’ इतकी संपत्ती त्याच्या कडे असते दुसरीकडे मात्र तो स्वतःची मानसिक शांतता गमावून बसतो.
सिंधी परिवारातुन आलेला रतन खत्री फाळणीनंतर कराचीहून मुंबईत आला होता. सुरुवातीला त्यानं कल्याणजी भगत यांच्यासोबत काम केलं ज्यांनी 'कल्याण मटका' सुरू केला होता. मात्र १९६४ मध्ये खत्री याने स्वतःचा 'न्यू वरळी मटका' सुरू केला होता. बॉम्बे हायकोर्टात या सिरीजच्या सत्यतेवर वादही झाला आहे. कारण कल्याणजी भगत यांच्या वारसांनी दावा केला आहे की, खरा ‘मटका किंग’ तो होता. रतन खत्री नव्हे. असो खरा मटका किंग तरी जनमानसात रतन खत्री चं होता. असं दिसुन येते. ही वेबसिरीज आपल्याला एकचं शिकवते “जुगार हा केवळ पैशाचा चं नसतो, तो माणसाच्या अहंकाराचा, सत्तेचा आणि दुर्बलतेचाही असतो.” त्याकाळी मटका हा केवळ नशिबाचा खेळ नव्हता तर तो विश्वासाचा खेळ होता.खत्री लोकांसमोर पत्त्यांच्या कॅटमधून तीन पत्ते काढत असे.
ही प्रामाणिकता त्याने शेवटपर्यंत जोपासली. एकदा पोलीस स्टेशन मध्ये असतांना ही केवळ पोलीसाच्या पट्टयाच्या नंबर वरून, विमानात असतांना पायलट ची मदत घेवुन, किंवा मुलगा बाहेर जावु देत नव्हता म्हणून घरी देखील पत्ते उघडले माहीत होतं कोणत्या आकड्यांवर जास्त पैसे लागले तरी प्रामाणिक पणे पत्ते उघडले ह्या गोष्टी त्याला जनसामान्यांचा हिरो बनवतात. आणीबाणीच्या काळात जेव्हा कामगारांचा संप असतो तेव्हा त्याने केलेले भाषन मनाला भिडते एकदा मटका बंद झाला तरी चालेल मात्र तुमचा हक्क तुम्ही सोडु नका ही भूमिका नायक घेतो. ती खरोखरचं वाखानन्याजोगी आहे. रतन खत्री यांच्या जीवनावर ‘धर्मात्मा’ हा चित्रपट आला होता. त्याने 'रंगीला रतन' नावाच्या चित्रपटाची निर्मितीही केली आणि त्यात स्वतः कामही केलं होतं. अनेक चित्रपटांमधील जुगारी पात्रांची मांडणी खत्रीच्या व्यक्तिमत्वावरूनचं केली जात होती असं बोलल्या जातं.
'मटका किंग' ही सीरिज अशा जगात घेऊन जाते जिथे 'मटका' हा फक्त जुगार नसून सत्ता, गणित, मानसशास्त्र आणि सामाजिक वास्तव यांचा गुंता आहे. आर्थिक प्रगतीच्या शोधात माणसाच्या नितीमत्तेची घसरगुंडी कशी होत जाते ते रंजक पद्धतीनं दाखवणारी वेब सीरिज आहे.गिरण्यांमध्ये कापडाचा एकेक धागा विणला जातो तसं नागराजनं कथेतल्या व्यक्तिरेखांचा एक-एक धागा विचारपूर्वक विणला आहे. त्याच्या दिग्दर्शकीय कौशल्याची कमाल प्रत्येक प्रसंगामध्ये दिसून येते. १९६४ ते १९७५ चा काळ हुबेहुब जसाच्या तसा उभं करण्यासाठी घेण्यात आलेली मेहनत दिसून येते. १९७० च्या दशकापर्यंत रतन खत्री हे देशातील सर्वांत मोठं नाव बनलं होतं. त्याचं दररोजचं टर्नओव्हर १ कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं होतं असं म्हटलं जातं. त्याच्या ग्राहकांमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड सेलिब्रिटी आणि प्रतिष्ठित व्यावसायिकांसह सर्व स्तरांतील लोकांचा समावेश होता. आणीबाणीच्या काळात त्याला अडचणींचा सामना करावा लागला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याला १९ महिन्यांसाठी तुरुंगात टाकलं होतं.
या सीरिजचं वैशिष्ट्य म्हणजे ही केवळ जुगारापुरती मर्यादित नाही. यात क्रिकेट, राजकारण, मनोरंजन, गिरणी कामगार आणि गुन्हेगारी विश्व यांच्याशी संबंधित अनेक पैलु पहायला मिळतात. हा संपूर्ण खेळ उघडकीस आणू पाहणाऱ्या एका शोधपत्रकाराचा समावेश देखील ही सीरिज घेते. प्रसिद्ध दिग्दर्शक रमेश तौरानी, अभिनेते विकी कौशल आणि दिग्दर्शक करण जोहर सारख्या बॉलिवूडमधल्या मोठ्या नावांनी या वेब सीरीजचं कौतुक केलं आहे. परफेक्शनिस्ट आमिर खान याने सोशल मीडियावर या वेब सीरीजचं कौतुक करताना म्हटलं की, मला रतन खत्रीचा रोल साकारायला आवडला असता..सिरीज चा शेवट बघता निर्माते दुसरा सिझनसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. असं म्हटल्या जातं खऱ्या आयुष्यात मात्र ९ मे २०२० रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी दक्षिण मुंबईतील राहत्या घरी रतन खत्रीचा मृत्यू झाला. "मटका किंग” ही वेबसिरीज पाहिल्यानंतर एकच प्रश्न मनात घर करून राहतो आपण खरोखर कशाचा मटका लावतोय? पैशाचा, सत्तेचा, की स्वतःच्या तत्त्वांचा? जुगाराचा खरा तोटा म्हणजे पैसा नव्हे, तर माणूसपणाची होणारी दिवाळखोरी होय. सिरीज संपली पण डोळ्यांसमोर फक्त पात्र उभी राहतात. ब्रीज च्या बायकोचे ओले डोळे, त्याच्या मुलाची भेदक नजर,गुलरुखचा स्वप्नांसाठी हरवलेला चेहरा... सिरीज संपली पण तिची भेसूरता मनातून संपत नाही.या सिरीज मुळे माझ्या मनाचा दुर्बल कोपरा हलवून गेला. आणि कदाचित तोचं मटका किंगचा खरा 'विजय' आहे."
✍🏻प्रा. राहुल गोवर्धन माहुरे
शांतीनगर, जुनेशहर, अकोला
9822278925
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
शिवाजी महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे थाटात स्वागत !
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा