मुख्य सामग्रीवर वगळा

वैशिष्ट्यीकृत

  डाबकी रोड रुंदीकरणाचे काम योग्य रीतीने करा अन्यथा शिवसेना स्टाईलने... गेल्या 18 महिन्यापासून डाबकी रोड रुंदीकरणाचे काम कसे सुरू आहे हे आपल्या अधिकाऱ्यांनी कधी पहिले आहे का असा रोखठोक प्रश्न शिवसेना नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना विचारला आहे. कारण डाबकी रोड रुंदीकरणाचे काम 18 महिन्यांपासून अर्धवट असून ज्या ठिकाणी होत आहे त्याचे दोन्ही बाजूला रस्ता 3 मीटर, पाणी पुरवठा लाईन, नंतर इलेक्ट्रिक केबल आणि नाली असे काम होत आहे. त्यांनतर पाईप लाईन वर पेव्हर बसविण्याचे काम सुरु आहे. आणि त्याचे खाली सुध्दा काँकरीट टाकून वरून पेंव्हर टाकण्याचा अजब प्रकार सुरू आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग ची मूळ जबाबदारी मनपाची आहे. मात्र स्वतः योग्य रीतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग न करता नागरीकांना ब्रह्मज्ञान सांगणे  कितपत योग्य आहे. आपण पेव्हर खाली काँकरीट बसविण्याचे काम थांबविण्याचे आदेश संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना त्वरित द्यावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने पुढील पाऊल उचलू, असा रोखठोक इशारा डॉक्टर अशोक ओळंबे यांनी दिला आहे.

निळकंठ सूतगिरणी पुन्हा होणार सुरू

  




अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने तब्बल दोन दशकांपासून बंद असलेली नीलकंठ सूत गिरणी पुन्हा सुरु होणार आहे. या निर्णयामुळे अकोला जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीला नवे बळ मिळणार आहे. निळकंठ सूतगिरणी सुरू करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी सतत पाठपुरावा केला.


निळकंठ सुत गिरणी बंद पडल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक रोजगाराच्या संधी कमी झाल्या होत्या. आता गिरणी सुरु झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे कापूस उत्पादक शेतक-यांना याचा थेट फायदा होणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. 




अकोला औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष मनोज एम. खंडेलवाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला नवे आयाम मिळत आहेत. नीलकंठ सूत गिरणीचे पुनरुज्जीवन झाल्याने रोजगार वाढेल, शेतक-यांच्या कापसाला नवा आधार मिळेल आणि अकोल्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल." 




आमदार रणधीर सावरकर हे उद्योगपूरक दृष्टिकोनातून काम करीत असून, विविध उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांच्या पुढाकारामुळेच हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला, असेही उद्योग क्षेत्रातून सांगण्यात येत आहे. 


या निर्णयामुळे अकोला जिल्हा औद्योगिक नकाशावर ठळकपणे उमटेल आणि भविष्यात नव्या गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास उद्योग जगतातून व्यक्त होत आहे.

टिप्पण्या