जाणून घ्या कशी झाली जागतिक महिला दिनाची सुरुवात - प्रा. राहुल माहुरे
८ मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. हा केवळ उत्सवाचा दिवस नसून महिलांच्या अधिकार, समानता आणि सन्मानासाठी झालेल्या ऐतिहासिक संघर्षांची आठवण करून देणारा दिवस आहे. स्त्रीच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात विसाव्या शतकाच्या प्रारंभी महिलांच्या हक्कांसाठी झालेल्या चळवळीमधून झाली. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे “सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिका” या संघटनेने पहिल्यांदा राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला. याच काळात औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी कामाचे तास, वेतनातील समानता आणि मतदानाचा अधिकार यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली. काही इतिहासकारांच्या मते १८५७ मध्ये वस्त्रोद्योगातील महिला कामगारांनी केलेल्या आंदोलनातून या चळवळीचे बीज पेरले गेले. यानंतर १९१० मध्ये डेन्मार्कच्या कोपनहेगन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत ८ मार्च हा दिवस महिलांच्या सन्मानासाठी साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या परिषदेत १७ देशांतील शंभराहून अधिक महिला प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. त्यानंतर ८ मार्च १९११ रोजी ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या देशांमध्ये लाखो महिलांनी एकत्र येऊन मतदानाचा अधिकार, नोकरीतील समान संधी आणि लिंगभेदाविरुद्ध आवाज उठवला.
रशियामध्ये १९१७ साली महिलांनी “ब्रेड अँड पीस” या घोषणेअंतर्गत युद्ध संपविण्याच्या मागणीसाठी मोठी चळवळ उभारली. पेट्रोग्रॅड (आजचे सेंट पीटर्सबर्ग) येथे सुरू झालेल्या या आंदोलनाने राष्ट्रीय स्वरूप धारण केले. सात दिवसांच्या या संघर्षानंतर रशियन सम्राट निकोलस यांनी महिलांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्यांना मतदानाचा अधिकार प्रदान करण्यात आला. त्यानंतर रशियामध्ये ८ मार्च हा दिवस अधिकृत सुट्टीचा दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
जगभरात या दिवसाला सामाजिक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. अखेरीस १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने ८ मार्च हा दिवस अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला. तेव्हापासून दरवर्षी या दिवसासाठी वेगवेगळ्या संकल्पना (थीम) जाहीर केल्या जातात.
२०२६ साठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम "Give to Gain" म्हणजेच “देण्याद्वारे मिळवणे” अशी आहे. या संकल्पनेचा मूलभूत अर्थ असा की महिलांना शिक्षण, संधी, संसाधने आणि पाठिंबा दिला तर त्याचा फायदा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी मार्ग मोकळा होतो. स्त्री सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होते, समाज सक्षम होतो आणि राष्ट्राची प्रगती अधिक वेगाने घडते.
जगातील विविध देशांमध्ये महिला दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही देशांमध्ये हा अधिकृत सुट्टीचा दिवस असतो, तर काही ठिकाणी महिला संघटना, सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्था महिलांच्या हक्कांबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करतात. काही देशांत महिलांना फुले, भेटवस्तू देऊन सन्मानित केले जाते, तर काही ठिकाणी महिलांच्या हक्कांसाठी मोर्चे, चर्चा आणि परिषदांचे आयोजन केले जाते.
इतिहासात पाहिले तर स्त्रियांचे योगदान केवळ सामाजिक चळवळीपुरते मर्यादित नाही. वैदिक काळापासून शिक्षण, तत्त्वज्ञान, विज्ञान, राजकारण, युद्धनीती आणि प्रशासन अशा अनेक क्षेत्रांत महिलांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारताच्या इतिहासात अनेक पराक्रमी आणि दूरदर्शी स्त्रियांची नावे अभिमानाने घेतली जातात. दिल्ली सल्तनतची पहिली महिला शासक रजीया सुलताना, काकतीय राज्याची कुशल राज्यकर्ती रुद्रमा देवी, तामिळनाडूतील ब्रिटिशांविरुद्ध लढा देणारी राणी वेलू नाचियार, मराठा साम्राज्याचे नेतृत्व करणारी राणी ताराबाई, तसेच १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील पराक्रमी योद्धा झाशीची राणी लक्ष्मीबाई या स्त्रियांनी इतिहासात अमिट ठसा उमटवला आहे. त्याचप्रमाणे चांदबीबी, राणी अब्बाका, कित्तूर चेन्नम्मा, माई भागो आणि राणी दुर्गावती यांसारख्या अनेक रणरागिणींनी आपल्या धैर्याने आणि नेतृत्वाने समाजाला प्रेरणा दिली.
आजच्या आधुनिक युगात महिला विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, प्रशासन, क्रीडा, कला आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. महिलांनी अवकाश संशोधनापासून ते सैन्यदलापर्यंत आणि उद्योगविश्वापासून ते राजकारणापर्यंत सर्वच क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. अनेक देशांमध्ये महिला राष्ट्रप्रमुख, वैज्ञानिक, उद्योजक आणि समाजसुधारक म्हणून नेतृत्व करताना दिसतात.
भारतातही महिलांच्या प्रगतीसाठी अनेक सामाजिक आणि शैक्षणिक चळवळी झाल्या. महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे , रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी यांसारख्या समाजसुधारकांनी महिलांच्या शिक्षणासाठी मोठे कार्य केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच महिलांना शिक्षण, स्वावलंबन आणि स्वाभिमानाचा मार्ग खुला झाला. आज शिक्षण, स्वयंसहाय्यता गट, उद्योजकता आणि प्रशासनाच्या माध्यमातून भारतीय महिला समाजपरिवर्तनाची मोठी ताकद बनल्या आहेत. म्हणूनच आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा केवळ अभिनंदनाचा दिवस नाही, तर समाजाने आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे.
स्त्री-पुरुष समानतेचा विचार केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवणे ही काळाची गरज आहे. महिलांच्या सन्मानाचे, अधिकारांचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणे ही प्रत्येक समाजाची जबाबदारी आहे. महिला म्हणजे केवळ कुटुंबाची आधारस्तंभ नव्हे, तर समाजाच्या प्रगतीची शक्ती आहे. तिच्या कर्तृत्वाला योग्य संधी मिळाल्यास ती इतिहास घडवू शकते. म्हणूनच महिलांच्या संघर्ष, पराक्रम आणि योगदानाला सलाम करताना आपण सर्वांनी समानता, सन्मान आणि सहकार्याच्या भावनेने पुढे जाण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. तमाम मातृशक्तीला माझे कोटी कोटी प्रणाम
– प्रा. राहुल गोवर्धन माहुरे, शांतीनगर, जुने शहर, अकोला
9822278925८

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा