अकोला : दहिगाव गावंडे येथील शालिकराम गावंडे हे अल्पभूधारक शेतकरी (वय 75) त्यांच्या पत्नी सुमन गावंडे (वय 69). अनेक वर्षापासून दोघांचा सुरळीत संसार सुरू होता. जीवनभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका अनेक जण घेतात, परंतु याचे जिवंत उदाहरण गावंडे दाम्पत्याचे आहे.
सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुपारी शालिकरामजी गावंडे यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. मुलाने डॉक्टरांना बोलावले. प्रकृती चिंताजनक असून फारसे काही करण्यासारखे नाही हे डॉक्टरच्या लक्षात आले. त्यांनी कुटुंबीयांच्या परिस्थिती लक्षात आणून दिली. गावंडे यांना खाली सतरंजीवर ठेवण्यात आले. घरातील सर्व मंडळी रात्री उशिरापर्यंत प्रकृतीत काही सुधारणा होते का या चिंतेत होते. मुलगा शंकर गावंडे रात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी आई जवळ गेला. आईला उठविण्याचा प्रयत्न केला मात्र काहीच हालचाल झाली नाही. वडील जाण्याच्या अवस्थेत असताना आईच सोडून गेली.
हे पाहून, शंकर वडिलांजवळ गेला. अवघ्या पाच मिनिटाच्या अंतराने म्हणजे एक वाजून 30 मिनिटांनी वडिलांनी सुद्धा अखेरचा श्वास घेतला. एकाच वेळी दोघांच्या जाण्याने दहिगाव गावंडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे सुपुत्र शंकर गावंडे हे सुद्धा अल्पभूधारक शेतकरी आहे.