अकोला : रामनवमी जवळ आली की वेध लागतात ते मोठ्या राम मंदिरातील राम जन्मोत्सवाचे. राम भक्तांची पावले आपसूकच राम मंदिराच्या दिशेने वळतात. दरवर्षी रामनवमीचा उत्सव याची देही याची डोळा पाहण्यासारखा असतो. यावर्षी सुद्धा श्री रामनगर मित्र मंडळ, श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था, श्रीराम हरिहर संस्था, सागर भारुका मित्र मंडळातर्फे उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
प्रभू श्रीरामचंद्रांचा उत्सव टिळक रोड स्थित रिगल टॉकीज मोठ्या राम मंदिर परिसरात दरवर्षी साजरा करण्यात येतो. यावर्षी सुद्धा संत गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र स्वर्गीय बच्चुलाल अग्रवाल स्थापित मोठ्या राम मंदिरात श्री प्रभू रामचंद्राचा प्रगट उत्सव रविवार 6 एप्रिल रोजी ठीक दुपारी बारा वाजता साजरा होणार आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी पाहता श्री रामनगर मित्र मंडळ, श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था, श्रीराम हरिहर संस्था, सागर भारुका मित्र मंडळ तर्फे राम रामेश्वर हनुमान मंदिर परिसरात श्री प्रभू रामचंद्राचा प्रगट उत्सव व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाआरतीनंतर सामाजिक समरसतेची खिचडी वितरण करण्याचा कार्यक्रम होणार आहे.
प्रभू रामचंद्रांचा पाळणा तयार
श्रीराम जन्मोत्सवासाठी एक आकर्षक प्रभू रामचंद्राचा बालपणाचा पाळणा तयार करण्यात आला आहे. पाळण्यामध्ये बाल श्रीराम मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. सौभाग्यवती रिता अग्रवाल यांच्या सहकार्याने सुमनदेवी अग्रवाल, गिरीश जोशी, सागर भारुका, संजय अग्रवाल, अजय गुल्हाने, राम रतन सारडा, विशाल लड्डा, आशिष शर्मा, डिके चाकर,अनिल मानधने, गिरीराज तिवारी, चंदनिश अग्रवाल , विनय जोशी, संतोष गोयंका बनवारीलाल बजाज, दीपक महाराज हलवाई, अशोक तोष्णीवाल, सतीश गोयंका, विनायक शांडिल्य गुरुजी यांच्या सहकार्याने आकर्षक प्रभू रामचंद्राचे बाल स्वरूपाचे दर्शन भक्तांना करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. महाआरतीने व राम खिचडीने राम प्रगट उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्थेचे कार्य
श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य सेवेमध्ये सातत्याने कार्यरत आहे. या संस्थेने अकोला शहराच्या राम मंदिर उद्घाटनाच्याप्रसंगी 400 किलो लाडू प्रसादाचे वितरण केले होते. याच धरतीवर प्रभू रामचंद्र बाल स्वरूप प्रगट उत्सव व संत गजानन महाराजांच्या पादुकांचे दर्शन या निमित्ताने होणार आहे. रिगल टॉकीज राम रामेश्वर हनुमान मंदिर परिसरात यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.