आ. साजिद खान यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना मागणी
अकोला : पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांना अकोला ते मुंबई विशेष रेल्वे सुरू करीत त्या गाडीला श्री. संत गजानन महाराज एक्स्प्रेस नाव देण्याची मागणी केली आहे.
अकोल्यातून दैनंदिन मुंबईला मोठ्या प्रमाणात नागरिक प्रवास करतात. प्रवाशांची सोय व्हावी व त्यांना तात्काळ आरक्षण मिळावे यासाठी अकोला ते मुंबई अशी विशेष रेल्वेची मागणी अनेकदा प्रवाशांकडून केल्या जाते. तर दुसरीकडे विदर्भातील अकोला हे भौगोलिक दृष्ट्या केंद्रबिंदू आहे. शेजारील बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा मुंबईला जायचे असले की ते अकोल्यात येत असतात. तर दुसरीकडे संपूर्ण देशभर प्रसिद्ध असलेले श्री. संत गजानन महाराज संस्थान हे सुद्धा अकोला शेजारी आहे, असंख्य भाविक भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असल्याने दूरवरून, मुंबईहुन सुद्धा याठिकाणी भाविक दर्शना करिता येतात. या सर्व बाबींचा विचार करीत अकोला ते मुंबई प्रवासासाठी विशेष रेल्वे गाडी देण्यात यावी. तर या रेल्वेला श्री. संत गजानन महाराज एक्स्प्रेस असे नाव देण्यात यावे अशी मागणी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.
सिद्धेश्वर एक्स्प्रेस चा दिला दाखला
ज्या प्रमाणे सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी सिद्धेश्वर एक्स्प्रेसची निर्मिती करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर अकोला ते मुंबई प्रवासासाठी श्री. संत गजानन महाराज एक्स्प्रेस या नावाने विशेष रेल्वे देण्यात यावी अशी मागणी आ. पठाण यांनी केली आहे.