अकोला : बिर्ला कॉलनी येथील स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात आणि आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा होतो. यावर्षीच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेचा संपूर्ण कारभार विद्यार्थी परिषदेने सांभाळला.
सकाळच्या सत्रात, विद्यार्थी परिषदेच्या नवनियुक्त सदस्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडली. 'हेड बॉय सुगत गोपनारायण आणि 'हेड गर्ल' गायत्री बाभूळकर यांनी मुख्याध्यापकांची जबाबदारी सांभाळली, तर इतर विद्यार्थ्यांनी विविध वर्गांचे शिक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पाठांचे नियोजन केले, वर्ग शिकवले आणि शाळेतील शिस्तही राखली. शिक्षकांच्या भूमिकेत असलेले विद्यार्थी पाहून सर्वच जण प्रभावित झाले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटकार्ड्स आणि फुले देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. . शिक्षकांच्या कार्याचे महत्त्व सांगणारी भाषणे सादर करण्यात आली. याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.श्वेता दिक्षित यांच्या प्रेरणेने शाळेतील सर्व शिक्षकांसाठी शाळेतील कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक विभागाद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विनोदी नाटीका, लेझीम नृत्य, नृत्य, हास्य कवि संमेलन,रॅम्प वाक, तसेच विविध मनोरंजनात्मक खेळाचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाबद्दल बोलताना शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.श्वेता दिक्षित यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, "शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी परिषदेने शाळेचा कारभार सांभाळून एक सुंदर उपक्रम राबवला. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या भूमिकेचे आणि त्यांच्या जबाबदारीचे महत्त्व समजले. आपल्या शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्याचा हा एक अनोखा मार्ग होता."
सदर कार्यक्रमाचे नियोजन सोनाली यदू,वैशाली अवचार,सागर म्हसाळ,वैशाली अग्रवाल यांनी मुख्याध्यापिका डॉ.श्वेता दिक्षित यांच्या मार्गदर्शनात केले. या कार्यक्रमामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाते अधिक दृढ झाले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त केले, तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तम भविष्य घडवण्याची प्रेरणा दिली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या